एका स्टेटस मागची गोष्ट...

*एका स्टेटस मागची गोष्ट...*

मी रात्री ९.३० नंतर शक्यतो फोन घेत नाही. व्ही-व्हीआयपी ची फोनवरच्या यादीतील व्यक्तीने दोनदा फोन केल्यावर तातडीचा म्हणून माझा फोन वाजायला सुरुवात होते. हे सांगण्याचे कारण असे की परवा रात्री काम आटोपून घरी यायला उशीर झाला मग जेवायला उशीर मग झोपायला... असे करत १०.३० ला अंथरुणाला पाठ टेकल्यानंतर १०-१५ मिनिटांनी फोन वाजला. आमचे सख्खे व्यावसायिक शेजारी फोनवर होते. आत्ताच लोहगडावरुन आलो असे ऐकल्यावर मला वाटलं काही तरी वेगळा अनुभव आला असणार लोहगडावर तेव्हा मला फोन केला असणार, पण त्या विषयाची तार सोडून त्यांनी त्यांच्या लेकीचे  नांव घेतले, जी वकिलीच्या अंतिम वर्षाला आहे, बोलताना‌ आवाज थोडा गहिवरला, मला कळेना काय झालं आहे?
पुढे अगदी क्षणभर दोन्ही बाजूंचे संभाषण थबकल्यावर त्यांनी सांगितले की गेले एक दीड महिना त्यांची लेक एका सिनियर वकिलांकडे मदत वजा प्रशिक्षण वजा काम अशाकरीता नियमित जात होती. त्या जेष्ठ वकिलांनी एवढे दिवस सोबत काम केल्याचा मेहनताना म्हणून काही रक्कम दिली, या लेकीने तिच्या बाबाकरीता एक सुंदर इटालियन धाटणीची अंगठी घेतली व दिली. या साऱ्या घडामोडीने हे आमचे सख्खे व्यावसायिक शेजारी (रहायला लांब सुखसागर नगरात आहेत) गहिवरले व त्यांनी मला फोन केला. आवाजात गहिवर जाणवत होताच...
मी झटकन चार ओळी लिहिल्या व त्यांनी पाठविलेल्या त्या सुंदर अंगठीच्या फोटोला जोडून पुन्हा पाठवल्या....


*भेटीचा हा कसा गुलाब फुलला,*
*अंगुष्ठिका प्रगटली त्या गुलाबाला।।*
*लेक ओती प्रथम कमाई त्यापरती*
*रत्न, हिरे फिकेच जाण ते त्यापुढती।।*
*इंचभराने अभिमाने ही फुगली मज छाती*
*काय वर्णू आनंद जगी हा, लेक झाली हो कमावती।।*

या त्या ओळी होत्या, त्यांनी या ओळी फोटोला जोडून व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्या वर परत फोन केला की याच भावना त्यांच्या मनात होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो पण हा रात्रीचा गहिवर काही डोक्यातून जाईना. त्यांना आलेला लेकीच्या पहिल्या कमाईचा आनंद, गहिवर, तो आनंद वाटण्याची बाप म्हणून झालेली घाई आणि त्यात मला सामावून घेणे. सकाळी चहा झाल्यावर एक एटीएमची जुनी पावती सापडली त्यावर
*छलक जायें आसू, बदल जाये ऩूर*
*ओलाद तरक्की करलें तो*
            *खुशियाॅं फैले दूर दूर ||*
*पेश हुआ नजारा-ए-खास*
         *जो पहिली तनख्वाह से था*
*हिरे, मोती, सोना*
           *उससेभी किमती जो था ||*
*क्या सोचता ए सुमिल*
              *ऐसा क्या वकार था*
*वो तो खुशनसीब है दोस्तों*
         *लडकी का बाप जो था ||*
असे खरडले, मोबाईल वर टाईप केले, पण नंतर तो फोटो डोळ्यासमोर आला, तो फोटो निवडला व दिले स्टेटस ठेवून.
बऱ्याच जणांनी फोन करुन विचारले, मेसेज करुन विचारले हे काय आहे. त्यांच्या साठी हा लेखनप्रपंच...😀

तीन वाढदिवसांचे भाग्य....

       १ ऑगस्ट उजाडले की सकाळ पासून मोबाईल शुभेच्छांच्या संदेशांनी वाजू लागतो, पण या शुभेच्छा असतात बॅंकेच्या, इन्शुरन्सच्या आणि जिथे जिथे पॅन व आधार दिले गेले आहे त्या त्या संस्थेच्या. पण ती चाहूल असते खरा वाढदिवस जवळ आल्याची. आपला वाढदिवस या आर्थिक संस्थांच्या सर्व्हरला का होईना म्हणजेच त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणा किंवा त्या चार ओळींच्या कोडला म्हणा जाणवून एखाद्या एसएमएस, टेक्स्ट मार्फत माझ्या पर्यंत पोहोचतोय हेच जरा सुखावणारं वाटतं तोच भिंतीवरच्या दिनदर्शिकेकडे लक्ष जाते आणि नजर शोधू लागते ती आसपासची श्रावण कृष्ण नवमी ही तिथी. 

       होय, श्रावण कृष्ण नवमी, हा हिंदू पंचांगानुसार माझा वाढदिवस, देशभरात जगभरात गोपाळकाला म्हणून साजरा केला जाणारा जन्माष्टमी नंतरचा खास दिवस. घरातल्यांना तसेच नातेवाईकांना हा दिवस विशेषत्वाने तिथीने लक्षात रहात असल्याने या दिवशी या सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव त्यानिमित्ताने होतच असतो. शाळा-कॉलेज पूर्ण होईपर्यंत मात्र या दिवशी माझे घरात कधीच पाऊल नसायचे. गावी असताना गोविंदाच्या निमित्ताने सर्व गांवभर नाचण्याच्या निमित्ताने घरी पुन्हा येईपर्यंत रात्र होऊन जायची, घरी आल्यावरही कधी एकदा अंघोळ करुन झोपतो असे व्हायचे. दिवसभरात ठिक ठिकाणी काल्याचा प्रसाद मुख्यतः दही-पोहे खाऊन पोट तुडुंब भरलेले असायचे. आईला हे आधीच माहिती असल्याने ती सकाळीच घराबाहेर पडताना औक्षण करून घ्यायची. गोविंदा खेळायला जायचे असल्याने वाढदिवसासाठी आणलेले नविन कपडे त्याचदिवशी घडी मोडणे व्हायचेच नाही. फारफार तर सकाळी औक्षणावेळी ते नविन आणलेले कपडे अंगावर चढवून पुन्हा घडी घालून ठेवून द्यायचे ते पुन्हा २१ तारखेला काढण्यासाठी…


        होय, २१ ऑगस्ट ही मात्र माझी इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे जन्मतारीख, पण शालेय प्रवेशाकरीता १ ऑगस्ट अशी वडीलांनी नोंदवल्या मुळे ती अधिकृत सर्व कागदपत्रांवर रुजू झाली पण आजतागायत मी त्या दिवशी वाढदिवस साजरा केला आहे किंवा कोणी त्यादिवशी शुभेच्छा दिल्या आहेत असे झाले नव्हते. पॅन कार्ड, बॅंक खाते व इतर आर्थिक व्यवहार सुरू झाल्यावर त्या त्या संस्थांकडून दरवर्षी शुभेच्छा येऊ लागल्या त्यावेळेस ते जाणवू लागले. 

       या २१ तारखेची शालेय जीवनातील पक्की आठवण होती ती म्हणजे इयत्ता ६वी घ्या वर्गात असताना वर्तक मॅडम शाळेत इंग्रजी शिकवत असताना त्यांच्या तासाला त्या My Birthday नावाचा धडा नेमका त्याच दिवशी शिकवीत होत्या त्यांनी सर्वांना स्वतःचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो ते उभे राहून वाक्यात सांगायला सांगितले. मी उभा राहून - Today is my Birthday, असे म्हणताच मॅडमनी मला पुन्हा विचारले आणि त्यानंतर तो तास संपेपर्यंत सारे वर्गमित्र-मैत्रिणी मला एका सुरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. 

    आजच्या काळात या नवनवीन समाज माध्यमांमुळे, तसेच शालेय-कॉलेज जीवनातील, तसेच व्यावसायिक मित्र-मैत्रिणींच्या उत्साहामुळे गेले काही वर्षे या दिवशी शुभेच्छांचा महापूर येतो. फेसबुक, व्हॉट्सअप तसेच फोन मेसेजेस यांनी दिवस दोन दिवस सोहोळा असल्यासारखा शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतो. 

    कोविडपूर्वी ज्या ज्या ठिकाणी मिटींग किंवा कार्यक्रम असायचा त्या ठिकाणी केक - सेलिब्रेशन हे ठरलेले असायचे. कोविडमध्येही ऑनलाईन सेलिब्रेशन हे अतिशय हेवा वाटावा, आपण कोणतरी सेलिब्रिटी असावे अशा थाटाचे होते. यावर्षीही अनेक स्नेह्यांनी अगदी शाळकरी सवंगडी, मित्र मंडळींपासून ते अगदी व्यावसायिक, सामाजिक मित्र मंडळींपर्यंत सर्वांनी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करीत व्यस्त ठेवले. एका विशेष मित्राने तर आता तू खराखूरा म्हातारा होतो आहेस अशा शुभेच्छा दिल्या. 

        माझ्या लेखी माझा वाढदिवस हे वर्षभरातल्या माझ्या संकल्पाच्या पूर्तीच्या दिवस असतो हेच खरे. आमच्या ५ मित्र-मैत्रिण-नातेवाईकांना हे किमान ५ संकल्प वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी‌ सांगावे लागतात. त्या बरहुकूम वर्षभराची वाटचाल सुरु होते व हे पाचजण वर्षभर या संकल्पांचा पाठपुरावा करतात आणि संकल्पपूर्ती कडे वाटचाल करवतात हे ही खरेच… आणि मलाही इतरांच्या संकल्पा करीता हे करावे लागतेच… बहुदा यातील एखाद्या सदस्याच्या संकल्पातूनच आपला पुढच्या संकल्पाची कल्पना साकारत जाते. एखाद्यावेळेस एखादा संकल्प पूर्ण करण्यास वेळ लागला तर तो संकल्प पुढे येणाऱ्या वाढदिवसाला पूर्णत्वास जातोच.

     तर या वर्षी मी ३ वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहून पूर्ण केली आहेत. दोन सामाजिक संस्थांची स्थापना केलेली आहे ज्यांचा मी स्वतः सदस्य/प्रमुख आहे. एक पूर्णतः नविन प्रकल्प सुरू केला आहे. वर्षभरात १०० विविध विषयांवरची पुस्तके वाचून पूर्ण केली आहेत आणि काही विशेष बदल स्वतः मध्ये केलेले आहेत. पुढच्या वर्षीच्या वाढदिवसासाठी अशीच नविन यादी तयार केली आहेच. 

      आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी‌ या संकल्पपूर्तीला बळ मिळो हीच अपेक्षा. पण खरे बळ तर या तीन वाढदिवसांनी मिळते हेच सत्य. पहिला १ तारखेचा वाढदिवस ही संकल्पांची यादी पुन्हा एकवार तपासायला लावतो. दुसरा तिथीनुसार येणारा वाढदिवस ती पूर्णत्वास नेण्यास मदत करतो तर तिसरा तारखेनुसारचा वाढदिवस ते संकल्प पुर्ण करावयास लावतो. नेता नसतानाही तीन तीन वाढदिवस एकाच महिन्यात साजरे करता यावे यासारखे भाग्य ते काय?

कदाचित् स्पर्शः

"बाबा, इन्स्ट्रुमेंट ला संस्कृत मध्ये काय म्हणतात?" धाकटे चिरंजीव अंथरुणावर पडण्यापूर्वी विचारते झाले. 

मी पण सांगितले "साधनं, असावे. पण वाक्यात कुठे आला आहे शब्द?" 

"नाही मला फक्त इन्स्ट्रुमेंट ला काय शब्द आहे ते हवंय" इति चिरंजीव...

"हार्ड बाउंड ला काय म्हणतात संस्कृत मध्ये" पुन्हा चिरंजीव

"तुझं नक्की काय सुरु आहे, असाईनमेंट राहीलेय का शाळेची? दिवसभर एक अक्षर नाही मग आत्ता का विचारतोस झोपताना?" पुन्हा मी

"मला हे काही शब्द हवे आहेत, संस्कृत मध्ये...." चिरंजीव

"बरं झोप आता, सकाळी पाहू..." मी

सकाळी सर्वजण लवकर उठून रोजची सर्व कामे आटोपून जो तो ज्याच्या त्याच्या कामाला गेला. मी कॉम्प्युटर टेबलवरचे पेपर्स आवरताना मला खाली फोटोत दिलेला पेपर सापडला. त्यात रात्री सांश्रयला सांगितलेले शब्द दिसले त्याच्या खाली तेच शब्द असलेली इंग्रजीतली सात आठ वाक्ये दिसली. मला उत्सुकता लागली की हे काय आहे. लेकाला विचारावे तर तो शाळेत. मोठ्या लेकाला विचारले तर तो म्हणाला, "सांश्रय रात्री आणी सकाळी उठल्यावर काही तरी लिहीत होता." मी विचार केला सांश्रय शाळेतून आल्यावर त्यालाच विचारु. 

संध्याकाळी काम आटोपून घरी आल्यावर सकाळी सापडलेल्या कागदाची आठवण झाली तसे सांश्रयला विचारले, तर तो हसायलाच लागला. 

मी विचारले "काय झाले रे हसायला?" 

तो म्हणाला "बाबा, शाळेत आज दिलेल्या विषयावर संस्कृत मध्ये पाच सहा वाक्यात माहिती सांगायची होती." 

"मग, काय झाले?"

"मी, थ्री इडियट मधला पुस्तकावरचा डॉयलॉग संस्कृतमध्ये म्हणून दाखवला. तुम्हाला सापडलेला कागद हा त्या डॉयलॉगची स्क्रीप्ट आहे."

मी मग पुन्हा संस्कृत आणी इंग्रजी असे दोन्ही वाचून पाहिले आणी डोक्याला हात लावला. या लेकाची क्रियेटीव्हीटी कुठे चालेल त्याचा नेम नाही....

आजही असे काही वेगळे झाले की आमचा परवलीचा शब्द असतो.... "कदाचित् स्पर्शः..."

घोटाळा ....... डोस्कीचा......

साधारण 12 ते 13 वर्षापुर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी DOS 6.22 फार जोरात होतं. विंडोज 3.1 व विडोज 3.11 ही तर व्हर्जन्सही नुकतीच ऐकायला येत होती. त्यावेळी एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत होतो. विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता तेथील काही शिक्षकांचीही एक बॅच शिकवून तयार करावी असा एक प्रस्ताव समोर आला आणि मीही त्या प्रस्तावाला आनंदाने हो म्हटले कारण त्या शिक्षकांच्या बॅच मध्ये मला 10वी 12वी ला शिकविणारेही नावाजलेले शिक्षक होते, अनायसे माझ्या गुरुंसमोरच माझा कस लागणार होता. या शिक्षकांच्या बॅचमध्ये जसे वरिष्ठ शिक्षक होते तसे काही नविन शिक्षकही होते. सुरुवातीला या सगळ्या गुरुजनांना संगणक म्हणजे काय हे समजवून सांगेपर्यंत घाम फुटला. कारण या गुरुजनांचे प्रश्नही तसे उत्तर द्यायला अडचणीचे असायचे. संगणकाची Input, Output, CPU अशी माहीती झाल्यावर हळूहळू आमची गाडी OS कडे वळू लागली मग क्रमाक्रमाने बुटींग, कमांड प्रॉम्प्ट असे करत करत आम्ही एकदाचे कमांडस् पर्यंत पोहोचलो. रोज काही कमांडस् सांगत सांगत आम्ही पुढे जात होतो. रोजचा ठराविक वेळेला मी शाळेत जाऊन हे सर्व शिकवायचो पण एका आठवड्यात मला पोहोचायला थोडा उशीर झाला (कारण डिटीपीचा व्यवसाय सांभाळून शिकवीत होतो ना!)
वर्गांच्या व्हरांड्यातून कॉम्प्युटर रुमकडे जाता जाता आमच्या शिक्षकांच्या बॅचमधील एक नविन शिक्षक मला पाहून माझ्यासोबत चालू लागले, आणी त्यानी मला सांगितले "सर मला ते कालचे डोस्की नाही समजले", मी त्यावेळेस वेळ मारुन नेण्याकरीता आमच्या गुरुजनांचीच युक्ती वापरली आणी सांगितले "सर आपण वर्गातच बघु ना काय आहे ते." ते नविन सर बरं म्हणाले पण थोड्या अंतरावर गेल्यांनंतर त्यांनी थोड्या मोठ्या आवाजात सांगितले " सर ते डोस्कीचं विसरु नका हं". हे नेमकं वाक्य आमच्या बॅचमधील एका जेष्ठ सरांनी ऐकले. ते म्हणाले यांच्या डोस्क्याला काय झालं आता? मी मात्र वर्गाकडे जात असताना माझ्या डोक्यात विचार येऊ लागले की मी कधी यांना "डोस्की" शिकविले? माझाच गोधंळ होऊ लागला. सुदैवाने या शिक्षकांची बॅच दुपारची होती पण तोपर्यंत पण माझ्या डोस्क्यात काहीच येईना. प्रत्यक्ष वर्गाची वेळ झाली आणि ज्या सरांनी सकाळी प्रश्न विचारला होता त्यांनी विचारले की सर काल तुम्ही जी डोस्की कमांड सांगितली ती मला समजली नाही. पण याही वेळेपर्यंत मला ही कमांड मी कधी शिकवली ते लक्षातच येईना, मग मी त्यांना सांगितले की मी अशी कोणतीही कमांड तुम्हाला शिकविलेली नाही. मग त्यांनीच मला फळ्यावर DOSKEY असे लिहिले मग मलाच हसू आवरत नव्हते आणि इतरही सर जोरजोरात हसू लागले आणि ज्या सरांनी हा प्रश्न विचारला त्यांना सांगू लागले अहो डोस्की नव्हे डॉसकी. सरांनी बरहुकुम मराठी भाषांतर केल्याने हा सगळा घोटाळा झाला, पण त्याचे स्पष्टीकरण असे आल्यानंतर सगळ्यांना हसू आवरेना व नंतर काही दिवस टिचर्स रुम मधून डोस्कीचे किस्से रंगत होते.
आजही त्या सरांची काही कामानिमित्त भेट झाली तर त्यांचा पहिला शब्द असतो - डोस्की

प्रवास... मनाचा

मी एकटाच, माझ्या उरल्या न आशा काही
संपले मार्ग हे सारे, निस्तेज दाही दिशाही ।

तो सुर्यही निघाला मावळतीच्या दिशेला
अन माझिया मनाची सर्व आस आज अस्ताला ।
अन चंद्रही निघाला ढगढगांच्या कुशीत
बोचरी निशा ही सारी भेसुर कोल्हेकुईत ।
ते काळजात माझ्या वाजे मध्यान्हीचे ठोके
अंधार चाचपडे पण आयुष्य ओकेबोके ।
प्रहर शेवटचा वाटे होणार का आज अंत
क्षणैक वाटले की हे हृदय झाले संथ ।।

कानावर पण दुरुनी आली भुपाळीची ओवी
प्रहर शेवटून जशी ती चाहूल प्रभातीची यावी ।
किलबिलाट आसमंतात पक्षांचा सारा घुमला
कालचा दिनकर तो आज इकडुनी उगवला ।
फेकूनी मरगळ सारी हे तन निश्चयी झाले
कालची निशा ती सरली मार्ग ते दृष्टीस आले ।
म्हणे मग मी स्वतःशी कोण मीच तो वेडा?
माझ्याच अडचणींचा मलाच वाचतो मी पाढा?
आले हसु मला ते माझ्याच त्या स्थितीचे
अन आज उमगले ते भावविश्व माझ्या मनाचे ।
झोकूनी दिली ती सारी लक्तरे पांघरुणांची
घेतली नशा पहाटेच अनभिषक्त निसर्गाची ।
उर भरुन भरला मी तो श्वास गार थंडगार
रोमरोमांत शिरला तो श्वास सोडता हळुवार ।
मग मनात आले की हा आणखी नवा दिवस
कसा जागवी मला तो लावे जगण्याची ही आस ।
मग एकटा कसा मी हा भास्कर सोबतीला
अदम्य उत्साहाचा लाल सागर पुर्व दिशेला ।

ठळकल्या सर्व त्या वाटा महामार्ग मला ते दिसले
द्रुतगतीत सारे माझ्या मनात परी ते ठसले ।
तनावरुन फिरल्या माझ्या गार जलाच्या या धारा
स्नान करता धुपल्या मळभाच्या रेषा साऱ्या ।
तन-मनात भरली स्फुर्ती रिचविता चहाचा पेला
भरभरला उदरामध्ये मार्ग सर्व जागवित गेला ।
एक एक वस्त्रे चढली तनावर लेवूनी सारी
जशी स्फुर्ती, उत्साह लेवून घेतली मनाने भरारी ।
कुंतल ते वळले सारे मग आपसूक हवे तसे
दर्पणही सोबतीला की ठाकठीक सर्व ते असे ।

मारली उडी मग मीही प्रत्यायास रोजनिशीचा
सुरु प्रवास सारा माझा की माझ्या वेड्या मनाचा…??

तुम्हाला माहिती आहेत का ही.... चिन्हे <>?:;',.

ब्लॉगवर पहिले पोस्ट टाकून बरेच दिवस झाले आणी नंतर लिहू लिहू असे करता करता मध्ये बरेच दिवस भाकड गेले (निदान तसे वाटले) 
पहिल्या वहिल्या ब्लॉगवर शाण्णव अंकसंख्या (खरे तर चलन संख्या) परिमाण बद्दल लिहिल्यानंतर मला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रीया मिळाल्या. 
आता तुम्हाला एक प्रयोग सांगतो. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर (म्हणजे आत्ताचे नोकरदार, व्यावसायिक, गृहीणी इत्यादी, पण पुर्वी मराठी माध्यमातुल शिकलेले सर्वजण किंवा आत्ताही मराठी माध्यमातून शिकत असणारे) प्रयत्न केल्यास प्रयोगाला हमखास यश! 
प्रयोग काय तर < व > अशी जी दोन चिन्हे आहेत त्याबद्दल विचारायचे. प्रश्न इंग्रजीत विचारलात की काम फत्ते. 
म्हणजे यातले लेस दॅन कोणते व ग्रेटर दॅन कोणते? मराठी माध्यमात शिकलेल्यांना च्या पेक्षा लहान व च्यापेक्षा मोठे अशी ही चित्रे माहिती आहेत. इयत्ता दुसरीचे पुस्तक आठवा ( आणी गवाणकरांचे व्यंगचित्रही आठवा - मडक्यांचे)  त्यावर या चिन्हांचा अर्थ चित्रातून स्पष्ट होतो. पण आमच्या शिक्षकवृंदाचा (अगदी आजही) समज आजही का तसा आहे याचे कोडे उलगडत नाही. 
वरील चिन्हांचा वापर करुन मी खालील प्रमाणे लिहिले 
9 < 10 आणी 10 > 9 
अनुक्रमे वाचले की नाईन इज लेस दॅन टेन व टेन इज ग्रेटर दॅन नाईन. इथे खरा तर चिन्हांचा अर्थ लगेच समजतो पण थोडेसे ताणून असे विचारले की मी पहिले वाक्य टेन इज ग्रेटर दॅन नाईन असे वाचले तर चालेल का? तर मराठी माध्यमातील शिकलेले लगेच सांगतात की चालेल किंवा दुसरे वाक्य नाईन इज लेस दॅन टेन असे वाचले तर चालेल का तर तेही हो असे उत्तर येते. मुळात मराठी माध्यमातील शिकलेल्यांना गणित ही सुध्दा एक भाषा असून तिला भाषेचे नियम लागू होतात हे मान्यच करत नाहीत त्याने हा सर्व घोळ होतो. पण मग इंग्रजी माध्यमातील मुले हुशार असतात का? तर तसेच काही नाही तर त्यांना सुरुवातीपासून < हे चिन्ह म्हणजे लेस दॅन व > हे चिन्ह म्हणजे ग्रेटर दॅन असे पक्के माहिती असते. गणित ही भाषा आहे याबद्दल मात्र दोन्हीकडे (सगळीकडे) वानवा. आता जर मी a = 5 असे लिहीले तर डावीकडील अक्षरास मधल्या चिन्हामुळे उजवीकडील किंमत लागू होते हे स्प्ष्ट झाल्यानंतर गणितातील कोणतेही वाक्य/समीकरण डावीकडून उजवीकडे वाचायचे असते हे स्पष्ट होते (माझ्या माहितीनुसार अगदी उर्दु मध्ये सुध्दा गणिताच्या बाबतीत हेच अवलंबिले जाते). मी हे इतके जणांना विचारले आहे की शेवटी कंटाळून शिक्षकांना (विशेषतः गणिताच्या) विचारायला सुरुवात केली तेव्हाही तेच. मग लक्षात आले की हा प्रवाह शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे वर्षानुवर्षे आहे त्यामुळे विविध वयोगटात व विविध स्तरांत या चिन्हांबद्दल विशेषतः मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या/होत असेलेल्यां कडून अशी उत्तरे मिळतात. 
तुम्ही प्रयोग करुन बघा. पण पहिल्या प्रयोगापासून मोजायला सुरुवात करा. आणी आकडा मला कळवायला विसरु नका मग तो अगदी लेस दॅन, ग्रेटर दॅन असला तरी...

शाण्णव अंकसंख्या परिमाण

खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा. 

१०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००

मी सांगू का? वरील संख्या आहे - दशअनंत. 

तुम्ही म्हणाल मला कशी कळली? 

मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की कोटी पर्यंत मोजल्यानंतर पुढे किती पर्यंत मोजता येईल? याचे उत्तर कित्येकजण खर्व, निखर्व, अमाप अशी नांवे सांगायचे. पण यांची स्थिती (म्हणजे एकं, दहं प्रमाणे) विचारल्यास मात्र ती कोणालाही सांगता यायची नाही. पुराणातल्या किंवा इतिहासातल्या कथांमध्ये "त्याच्याकडे अपार संपत्ती होती" असे उल्लेख वाचलेले आठवतात. पण अशा जर मोजदाद पुर्वी करता यायची तर त्यांची स्थानासहीत पुर्ण माहिती कुठेच का सापडत नाही ही उत्सुकता संपत नव्हती. असाच एकदा गावात फिरत असताना एक कागद रस्त्यावर सापडला आणी त्यात ही सर्व माहिती सापडली. ती तुमच्या करीता या ब्लॉगच्या माध्यमातून आणली आहे.

प्रचलित इंग्रजी किंवा मराठी (की देवनागरी) पध्दतीनुसार अब्ज या संख्येपेक्षा जास्त मोजदाद करणारे एकक हवे असेल तर ते जोडून वापरावे लागते, म्हणजे ४००० कोटी (चार हजार कोटी) आणी इंग्रजीत मिलियन, बिलियन आहेतच की. पण जर अशी दोन किंवा जास्त एकके न जोडता मोजता येऊ शकणाऱ्या संपुर्ण एककांची यादी खाली आहे. ती काळजीपुर्वक नजरेखालून घाला. यातील काही एकके आपल्या कानांवरुन पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा यातून गेली असतील. पण त्यात काही तथ्यांश आहे असे मानले तर आपल्या पुर्वजांकडे नुसतीच संपत्ती नव्हती तर ती मोजता येऊ शकेल किंवा त्याची मोजदाद करता येउ शकेल अशी मोजणीची पध्दती व एककेही होती. हा वारसा जपायला हवा म्हणून माझा हे छोटा प्रयत्न आहे. 

मुळात मी वर म्हटल्याप्रमाणे मला एका छोट्या पुस्तकातील पानावरील ही माहिती आहे. मी ह्या माहितीचे पुस्तक खुप शोधण्याचा प्रयत्न केला. कारण या पुस्तकात अजुनही बरीच रंजक माहिती असावी पण पुस्तकाचे नांव किंवा लेखकाचे नांव किंवा प्रकाशकाचे नांव काहीही मला मिळालेले नाही. कोणास माहिती असल्या अवश्य कळवा.

एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.

       मोजा आणि इतरांनाही सांगा.