तीन वाढदिवसांचे भाग्य....

       १ ऑगस्ट उजाडले की सकाळ पासून मोबाईल शुभेच्छांच्या संदेशांनी वाजू लागतो, पण या शुभेच्छा असतात बॅंकेच्या, इन्शुरन्सच्या आणि जिथे जिथे पॅन व आधार दिले गेले आहे त्या त्या संस्थेच्या. पण ती चाहूल असते खरा वाढदिवस जवळ आल्याची. आपला वाढदिवस या आर्थिक संस्थांच्या सर्व्हरला का होईना म्हणजेच त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणा किंवा त्या चार ओळींच्या कोडला म्हणा जाणवून एखाद्या एसएमएस, टेक्स्ट मार्फत माझ्या पर्यंत पोहोचतोय हेच जरा सुखावणारं वाटतं तोच भिंतीवरच्या दिनदर्शिकेकडे लक्ष जाते आणि नजर शोधू लागते ती आसपासची श्रावण कृष्ण नवमी ही तिथी. 

       होय, श्रावण कृष्ण नवमी, हा हिंदू पंचांगानुसार माझा वाढदिवस, देशभरात जगभरात गोपाळकाला म्हणून साजरा केला जाणारा जन्माष्टमी नंतरचा खास दिवस. घरातल्यांना तसेच नातेवाईकांना हा दिवस विशेषत्वाने तिथीने लक्षात रहात असल्याने या दिवशी या सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव त्यानिमित्ताने होतच असतो. शाळा-कॉलेज पूर्ण होईपर्यंत मात्र या दिवशी माझे घरात कधीच पाऊल नसायचे. गावी असताना गोविंदाच्या निमित्ताने सर्व गांवभर नाचण्याच्या निमित्ताने घरी पुन्हा येईपर्यंत रात्र होऊन जायची, घरी आल्यावरही कधी एकदा अंघोळ करुन झोपतो असे व्हायचे. दिवसभरात ठिक ठिकाणी काल्याचा प्रसाद मुख्यतः दही-पोहे खाऊन पोट तुडुंब भरलेले असायचे. आईला हे आधीच माहिती असल्याने ती सकाळीच घराबाहेर पडताना औक्षण करून घ्यायची. गोविंदा खेळायला जायचे असल्याने वाढदिवसासाठी आणलेले नविन कपडे त्याचदिवशी घडी मोडणे व्हायचेच नाही. फारफार तर सकाळी औक्षणावेळी ते नविन आणलेले कपडे अंगावर चढवून पुन्हा घडी घालून ठेवून द्यायचे ते पुन्हा २१ तारखेला काढण्यासाठी…


        होय, २१ ऑगस्ट ही मात्र माझी इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे जन्मतारीख, पण शालेय प्रवेशाकरीता १ ऑगस्ट अशी वडीलांनी नोंदवल्या मुळे ती अधिकृत सर्व कागदपत्रांवर रुजू झाली पण आजतागायत मी त्या दिवशी वाढदिवस साजरा केला आहे किंवा कोणी त्यादिवशी शुभेच्छा दिल्या आहेत असे झाले नव्हते. पॅन कार्ड, बॅंक खाते व इतर आर्थिक व्यवहार सुरू झाल्यावर त्या त्या संस्थांकडून दरवर्षी शुभेच्छा येऊ लागल्या त्यावेळेस ते जाणवू लागले. 

       या २१ तारखेची शालेय जीवनातील पक्की आठवण होती ती म्हणजे इयत्ता ६वी घ्या वर्गात असताना वर्तक मॅडम शाळेत इंग्रजी शिकवत असताना त्यांच्या तासाला त्या My Birthday नावाचा धडा नेमका त्याच दिवशी शिकवीत होत्या त्यांनी सर्वांना स्वतःचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो ते उभे राहून वाक्यात सांगायला सांगितले. मी उभा राहून - Today is my Birthday, असे म्हणताच मॅडमनी मला पुन्हा विचारले आणि त्यानंतर तो तास संपेपर्यंत सारे वर्गमित्र-मैत्रिणी मला एका सुरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. 

    आजच्या काळात या नवनवीन समाज माध्यमांमुळे, तसेच शालेय-कॉलेज जीवनातील, तसेच व्यावसायिक मित्र-मैत्रिणींच्या उत्साहामुळे गेले काही वर्षे या दिवशी शुभेच्छांचा महापूर येतो. फेसबुक, व्हॉट्सअप तसेच फोन मेसेजेस यांनी दिवस दोन दिवस सोहोळा असल्यासारखा शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतो. 

    कोविडपूर्वी ज्या ज्या ठिकाणी मिटींग किंवा कार्यक्रम असायचा त्या ठिकाणी केक - सेलिब्रेशन हे ठरलेले असायचे. कोविडमध्येही ऑनलाईन सेलिब्रेशन हे अतिशय हेवा वाटावा, आपण कोणतरी सेलिब्रिटी असावे अशा थाटाचे होते. यावर्षीही अनेक स्नेह्यांनी अगदी शाळकरी सवंगडी, मित्र मंडळींपासून ते अगदी व्यावसायिक, सामाजिक मित्र मंडळींपर्यंत सर्वांनी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करीत व्यस्त ठेवले. एका विशेष मित्राने तर आता तू खराखूरा म्हातारा होतो आहेस अशा शुभेच्छा दिल्या. 

        माझ्या लेखी माझा वाढदिवस हे वर्षभरातल्या माझ्या संकल्पाच्या पूर्तीच्या दिवस असतो हेच खरे. आमच्या ५ मित्र-मैत्रिण-नातेवाईकांना हे किमान ५ संकल्प वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी‌ सांगावे लागतात. त्या बरहुकूम वर्षभराची वाटचाल सुरु होते व हे पाचजण वर्षभर या संकल्पांचा पाठपुरावा करतात आणि संकल्पपूर्ती कडे वाटचाल करवतात हे ही खरेच… आणि मलाही इतरांच्या संकल्पा करीता हे करावे लागतेच… बहुदा यातील एखाद्या सदस्याच्या संकल्पातूनच आपला पुढच्या संकल्पाची कल्पना साकारत जाते. एखाद्यावेळेस एखादा संकल्प पूर्ण करण्यास वेळ लागला तर तो संकल्प पुढे येणाऱ्या वाढदिवसाला पूर्णत्वास जातोच.

     तर या वर्षी मी ३ वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहून पूर्ण केली आहेत. दोन सामाजिक संस्थांची स्थापना केलेली आहे ज्यांचा मी स्वतः सदस्य/प्रमुख आहे. एक पूर्णतः नविन प्रकल्प सुरू केला आहे. वर्षभरात १०० विविध विषयांवरची पुस्तके वाचून पूर्ण केली आहेत आणि काही विशेष बदल स्वतः मध्ये केलेले आहेत. पुढच्या वर्षीच्या वाढदिवसासाठी अशीच नविन यादी तयार केली आहेच. 

      आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी‌ या संकल्पपूर्तीला बळ मिळो हीच अपेक्षा. पण खरे बळ तर या तीन वाढदिवसांनी मिळते हेच सत्य. पहिला १ तारखेचा वाढदिवस ही संकल्पांची यादी पुन्हा एकवार तपासायला लावतो. दुसरा तिथीनुसार येणारा वाढदिवस ती पूर्णत्वास नेण्यास मदत करतो तर तिसरा तारखेनुसारचा वाढदिवस ते संकल्प पुर्ण करावयास लावतो. नेता नसतानाही तीन तीन वाढदिवस एकाच महिन्यात साजरे करता यावे यासारखे भाग्य ते काय?

कदाचित् स्पर्शः

"बाबा, इन्स्ट्रुमेंट ला संस्कृत मध्ये काय म्हणतात?" धाकटे चिरंजीव अंथरुणावर पडण्यापूर्वी विचारते झाले. 

मी पण सांगितले "साधनं, असावे. पण वाक्यात कुठे आला आहे शब्द?" 

"नाही मला फक्त इन्स्ट्रुमेंट ला काय शब्द आहे ते हवंय" इति चिरंजीव...

"हार्ड बाउंड ला काय म्हणतात संस्कृत मध्ये" पुन्हा चिरंजीव

"तुझं नक्की काय सुरु आहे, असाईनमेंट राहीलेय का शाळेची? दिवसभर एक अक्षर नाही मग आत्ता का विचारतोस झोपताना?" पुन्हा मी

"मला हे काही शब्द हवे आहेत, संस्कृत मध्ये...." चिरंजीव

"बरं झोप आता, सकाळी पाहू..." मी

सकाळी सर्वजण लवकर उठून रोजची सर्व कामे आटोपून जो तो ज्याच्या त्याच्या कामाला गेला. मी कॉम्प्युटर टेबलवरचे पेपर्स आवरताना मला खाली फोटोत दिलेला पेपर सापडला. त्यात रात्री सांश्रयला सांगितलेले शब्द दिसले त्याच्या खाली तेच शब्द असलेली इंग्रजीतली सात आठ वाक्ये दिसली. मला उत्सुकता लागली की हे काय आहे. लेकाला विचारावे तर तो शाळेत. मोठ्या लेकाला विचारले तर तो म्हणाला, "सांश्रय रात्री आणी सकाळी उठल्यावर काही तरी लिहीत होता." मी विचार केला सांश्रय शाळेतून आल्यावर त्यालाच विचारु. 

संध्याकाळी काम आटोपून घरी आल्यावर सकाळी सापडलेल्या कागदाची आठवण झाली तसे सांश्रयला विचारले, तर तो हसायलाच लागला. 

मी विचारले "काय झाले रे हसायला?" 

तो म्हणाला "बाबा, शाळेत आज दिलेल्या विषयावर संस्कृत मध्ये पाच सहा वाक्यात माहिती सांगायची होती." 

"मग, काय झाले?"

"मी, थ्री इडियट मधला पुस्तकावरचा डॉयलॉग संस्कृतमध्ये म्हणून दाखवला. तुम्हाला सापडलेला कागद हा त्या डॉयलॉगची स्क्रीप्ट आहे."

मी मग पुन्हा संस्कृत आणी इंग्रजी असे दोन्ही वाचून पाहिले आणी डोक्याला हात लावला. या लेकाची क्रियेटीव्हीटी कुठे चालेल त्याचा नेम नाही....

आजही असे काही वेगळे झाले की आमचा परवलीचा शब्द असतो.... "कदाचित् स्पर्शः..."